"आम्ही शाळेची प्रतिज्ञा रोज म्हणतो, पण ती हृदयाच्या गाभ्यात झिरपत नाही. मात्र, दुसरीच्या लहानशा वर्गात त्या प्रतिज्ञेचा जीवंत अर्थ साकारलेला दिसला. आज, सिद्धार्थच्या गुडघ्यास थोडीशी इजा झाली तेव्हा वर्गातील मुलींच्या संवेदनशीलतेचा जणू झरा वाहू लागला. एका जखमेवर औषध ठेवण्यासाठी त्यांचे छोटेसे हात धावत प्रथोमोपचार पेटीकडे पोहोचले. त्यांच्या त्या कृतीत मनोमन माणुसकीची गोड झलक दिसली. या वर्गातल्या बाळगोपाळांचे बंधुत्व तर अनमोल आहे. डब्बा न आणणारा कुणी असेल, तर इथे कोणीही उपाशी राहत नाही. स्वतःच्या डब्यातील अन्नाचा कणकण वाटून, हे लहान जीव मित्राच्या पोटाची सोय करतात. भुकेच्या रेषेवर मैत्रीची सावली पसरवतात. खरं तर, हीच खरी मानवतेची शिकवण आहे. माणूसकीचा हा नाजूक धागा लहानशा वर्गात विणला जातोय, त्याला जोपासले तरच आपलं भवितव्य उजळेल. या निरागस बंधनातच भविष्याची खरी मुळे दडलेली आहेत, ती अधिकच बळकट करण्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करायला हवेत."